एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, ३१ मार्च, २०१७

चला ग्रामपंचायतीला समजावून घेऊयात *पोलिस पाटील*

१) नियुक्ती - महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ नुसार जिल्हाधिकारी / उपजिल्हाधिकारी / प्रांत अधिकारी करतो.

२) वंशपरंपरागत पाटिलकी व वतनदारी बंद - कायदा १९६२ हा कायदा लागु झाला - १ जाने. १९६३

३) महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम - १९६७, लागू - ५ जून १९६८ हा कायदा मुंबई शहर व मुंबई उपनगरास लागू नाही.

४) महाराष्ट्र पोलीस नियमावली - १९६८

पात्रता -

१) वयोमर्यादा - २५ ते ४५ वर्षे

२) मुदत - ५ वर्षांसाठी व तेवढ्याच कालावधीसाठी दुस-यांदा परंतु ६० वर्षांनंतर नेमणुक करता येत नाही.

३) शिक्षण :- कमीत कमी ६ वी, अपवादात्मक – ४ थी, ४ थी पेक्षा कमी शिक्षण असल्यास नेमणुकीसाठी आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते.

४) गावचा रहिवाशी आसावा.

५) शारिरीक दृष्ट्या पात्र असावा

६) वर्तणूक चांगली असावी

७) मागासवर्गीयांना प्राधान्य दिले जाते.

* वेतन ८०० रु.

* पोलीस पाटलाच्या गैरहजेरीत काम पाहतो – शेजारच्या गावचा पोलिस पाटील

* पोलीस पाटलास किरकोळ रजा देण्याचे अधिकार (१२ दिवसांची) तहसिलदार

* पोलीस पाटलास पुर्ण कालीन नोकरी करता येत नाही. व्यवसाय करता येतो. इतर सरकारी नोकरांप्रमाणे सवलती मिळत नाही. परंतु अटी पुर्ण केल्यास मुलांना मोफत शिक्षण मिळते.

कार्ये –

१) गावात बंदोबस्त ठेवून गुन्ह्याला आळा घालणे

२) वरिष्ठ अधिका-यांना आवश्यक कागदपत्रे पुरविणे
३) नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तहसिलदारांना माहिती देणे
४) साथीच्या रोगांचा अहवाल तयार करणे
५) गावांत संशयास्पद मृत्यु झाल्यास तहसिलदार व पोलीस अधिका-यास कळविणे, मादक पदार्थाची माहिती देणे.
६) विना परवाना असलेले शस्त्र काढून घेणे. त्याचा वरिष्ठ अधिका-यास कळविणे, मादक पदार्थांची माहिती देणे.
७) चौकशीत पोलीसांना मदत करणे.
८) कोतवालावर नियंत्रण ठेवणे.

गुरुवार, ३० मार्च, २०१७

दस्त नोंदणी प्रक्रिया

दस्त नोंदणी प्रक्रिया

नोंदणी अधिनियम, १९०८ चे कलम २३ नुसार मृत्यूपत्र वगळून इतर दस्त निष्पादित सही झाल्याच्या तारखेपासून ४ महिन्यांच्या आत नोंदणीस सादर करता येतात.

अ.नोंदणी कार्यालयात गेल्यावर दस्त नोंदणी प्रक्रियेतील प्रमुख टप्पे कोणकोणते आहेत?

दस्त नोंदणी करण्यावर कोणत्याही कायदेशीर तरतुदींचे बंधन नसेल तर तो दस्त नोंदणीस स्विकारला जातो. अशा दस्ताच्या नोंदणी प्रक्रियेतील सर्वसाधारपण टप्पे खालीलप्रमाणे आहेत.

१. टोकन रजिस्टरमध्ये नोंद घेतली जाते व टोकन दिले जाते.

२. दुय्यम निबंधकाद्वारे दस्ताची पडताळणी केली जाते.

३. अगोदर पब्लिक डाटा एंट्री केली असल्यास, ११ अंकी सांकेतांकाचे आधारे दुय्यम निबंधक कार्यालयातील संगणकावर डाटा उपलब्ध करुन घेतला जातो अन्यथा दुय्यम निबंधक कार्यालयात इनपुट फॉर्मच्या आधारे डाटा एंट्री केली जाते.

४. यथोचित मुद्रां॑कित केलेला ( देय मुद्रांक शुल्क भरलेला) व नोंदणीस पात्र दस्त नोंदणीस सादर करुन घेतला जातो.

५. आवश्यक ती नोंदणी फी व दस्त हाताळणी शुल्क प्रदान केल्यांनतर त्याची पावती दिली जाते.

६. दस्त निष्पादक पक्षकारांकडून अथवा त्यांचे मुखत्यारपत्रधारकाकडून त्यांचे निष्पादनाचा कबुलीजबाब दिला जातो.

७. दस्तात नमूद मोबदला दुय्यम निबंधक यांच्यासमोर देण्यात येत असल्यास, त्याबाबतची नोंद दस्तावर घेतली जाते.

८. कबुलीजबाब देणा-या पक्षकारास ओळखत असलेल्या ओळखदारांकडून ओळख पडताळणी केली जाते.

९. दुय्यम निबंधक दस्तावर नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्र देतात.

ब. दस्त नोंदणीची प्रक्रिया किती वेळात पूर्ण होते ?

सर्वसाधारणपणे दस्त नोंदणीस स्वीकृत केल्यापासून ३० मिनिटांच्या आत दस्त नोंदणी पूर्ण करुन व स्कॅनिंग करुन मूळ दस्त पक्षकारांना परत दिला जातो. तथापि दस्तातील पानांची संख्या ५० पेक्षा जास्त असल्यास, वाढीव प्रत्येक ५० पानांच्या पेजींगसाठी साधारण १० मिनिटे इतका अतिरिक्त वेळ लागतो.

क. दस्त नोंदणीसाठी सादर करण्यासाठी कालमर्यादा :

1. नोंदणी अधिनियम, १९०८ चे कलम २३ नुसार मृत्यूपत्र वगळून इतर दस्त निष्पादित सही झाल्याच्या तारखेपासून ४ महिन्यांच्या आत नोंदणीस सादर करता येतात.

2. एका दस्तावर अनेक पक्षकारांनी वेगवेगळ्या वेळी सह्या केल्या असतील तर पहिल्यांदा झालेल्या सहीपासून सदर कालमर्यादा लावू होते.

ड. दस्ताची नोंदणी का करावी ? त्याचे फायदे काय आहेत?

दस्त नोंदणी केल्यास खालील फायदे होतात-

१. नोंदणी अधिनियम,१९०८ चे कलम ४९ नुसार, संबंधित दस्त त्यामध्ये नमूद व्यवहाराचा कायदेशीर पुरावा (Legal evidence) म्हणून स्विकारला जातो.

२. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम,१८८२ नुसार, विक्रीखत (Sale Deed), गहाणखत (Mortgage Deed ), भाडेपटटा (Lease Deed) व बक्षीसपत्र (Gift Deed) हे दस्त नोंदणी केले तरच त्यानुसार मिळकतीचे हस्तांतरण होते.

३. नोंदणी केल्यास त्या दस्ताचे आधारे हस्तांतरित होणारे हक्क प्रस्थापित होतात.

४. नोंदणी केल्यास त्या दस्तातील पक्षकार, दस्तामध्ये नमूद अटी व शर्ती/ व्यवहारास बांधील राहतात.

५. नोंदणी केल्यास त्या दस्तामध्ये नमूद व्यवहाराची पूर्तता करणेकरिता सक्षम न्यायालयात दाद मागता येते.

बुधवार, २९ मार्च, २०१७

चला ग्रामपंचायत समजावून घेऊयात उपसारपंचाची जबाबदारी

उपसरपंच

१) निवड - उप-सरपंच यांची निवड ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांमधून होते.

२) कार्यकाल - उप-सरपंच यांचा कार्यकाल - ५ वर्षे

३) उप-सरपंच यांच्या निवडीबाबत काही विवाद निर्माण झाल्यास, विवाद १५ दिवसांच्या आत सदरहू जिल्ह्याधिका-यांकडे अपील करता येते.

४) उप-सरपंच सलग तीन महिने गैरहजर राहिल्यास त्याची चौकशी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. त्या विरुध्द तीस दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील करावे लागते.

५) सरपंचास त्याच्या दैनंदिन कारभारात मदत करण्यासाठी एक उपसरपंच असतो. त्याची निवड ग्रामपंचायत सदस्याकडून सदस्यांमधून केली जाते.

६) उपसरपंच कदासाठी आरक्षण लागू नाही. सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल हा ग्रामपंचाशत कार्यकाल एवढाच असतो, काही कारणांनी सरपंचाला राजीनामा द्याचा असल्यास पंचायत समिती सभामतीच्या नावाने द्यावा
तर उपसरपंचाने सरपंचाकडे राजीनामा द्यावा.

७) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३५ नुसार सरपंच अथवा उपसरपंचावर अविश्वास ठराव दाखला करता येतो. अशा अविश्वास ठरावाची नोटीस १/३ सदस्यांच्या सहीने तहसीलदारास द्यावी लागते.त्यानंतर
नोटीस मिळाल्यानंतर तहसीलदार ७ दिवसांच्या आत ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवितो.

८) या सभोमध्ये २/३ बहुमताने अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यास उपसरपंचास पदावरून दूर व्हावे लागते. उपसरपंचाची अकार्यक्षमता, गैरवर्तणूक, भ्रष्टाचार, ग्रामसभा न घेणे या कारणांमुळे मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या
अहवालावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस उपसरपंच यांना पदावरून काढून टोण्याचा अधिकार आहे

९) उपसरपंच हे सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रमपंचायत सभेचे आध्यक्ष म्हणून काम चालवतात.

१०) सरपंचाने सोपविलेली कार्ये व जबाबरा-या पार पाढणे, सरपंच अनुपस्थित असेल अथवा त्याची निवड झाली नसेल तर उपसरपंच सरपंचाची कार्ये करतो.

११) ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंचाबराबरच प्रशासकीय प्रमुख म्हणून ग्रामसेवक-ग्रामसचिव असतो.

चला ग्रामपंचायतीला समजावून घेऊयात सरपंच व त्यांचे महत्व

चला ग्रामपंचायत समजावून घेऊयात भाग 2
विषय - सरपंच व त्यांचे महत्व
सरपंच

१) ग्रामपंचातीस एक राजकीय प्रमुख असतो, त्यास सरपंच म्हटले जाते.

२) सरपंचाच्या अनुपस्थितीत त्याचे काम पाहतो – उप सरपंच

३) कार्यकाल - सरपंच यांचा कार्यकाल - ५ वर्षे

४) सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांकडून व सदस्यांंतून पहिल्या सभेत केली जाते. समान मते पडल्यास निवड चिठ्ठ्या टाकून करतात.

५) एखादी व्यक्ती जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती असेल तर ती सरपंच म्हणून निवडून येण्यास पा९ असणार नाही

६) सरपंच पदासाठी दिखील आरक्षण लागू करण्यात आले आहे. अनुसूचित जाती व जमातीसाठी सरपंचाच्या पदाचे प्रमाण हे राज्यातील सरपंच पदाच्या एकूण संख्येशी लोकसंख्येचे जेवढे प्रमाण आहे, त्या प्रमाणात सरपंचपद राखीव असते.

७) राज्यातील सरपंचाच्या एकूण पदापैकी २७ टक्के पदे मागासवर्गातील प्रवर्गाच्या (ओबीसी) लोकांसाठी राखीव असतात तसेच राजयतील एकूण सरपंच पदापैकी १/३ पदे ही महिलांसाठी राखीव असतात. त्यामध्ये अनुसूचीत जाती व जमाती आणि मागासवर्गातील प्रवर्गाच्या महिलांचा समावेश आहे. या आरक्षण धोरणामुळे गावाच्या गावाच्या सरपंचपदी अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय महिला यांना काम करण्याची संधी मिळावी आणि त्यांनी त्या संधीचे सोने करीत ग्रामपंचायत कारभारत हा यशस्वीपणे चालवून दाखविला.

८) सरपंच यांच्या निवडीबाबत काही विवाद निर्माण झाल्यास, विवाद १५ दिवसांच्या आत सदरहू जिल्ह्याधिका-यांकडे अपील करता येते.

९) जिल्हाधिका-यांनी दिलेल्या निर्णयावर विभागीय आयुक्तांकडे १५ दिवसांच्या आत अपील करता येते.

१०) राजीनामा – सरपंचा आपला राजीनामा पंचायत समिती सभापतींकडे देतो, तर उपसरपंच आपला राजीनामा सरपंचांकडे देतो.

११) ग्रामपंचायतीत संमत केलेले टराव, योजना, विकास अराखडा आमलात आणण्यासाठी सरपंचास अधिकार देण्यात येत आहेत.

१२) ग्रामपंचात सरपंचास मुंबई ग्राम पंचात अधिनियम १९५८ कलम ३८ नुसार कार्य करावे लागते.

१३) त्या कार्यासाठी सरपंच हा प्रत्यक्ष जबाबदार असतो. त्यामध्ये ग्रामपंचात सदस्यांची मासिक बैठक बोलवीणे, ग्रामसभेच्या बैठकीचे आोजन करण, ग्रामपंचायतीच्या अधिकारी कर्मचा-यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे,
ग्रामपंचायत क्षेत्रातातील व्यक्तींना उत्पन्न, रहिवास, विविह, जन्म, मृत्यूचे दखले देणे, ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प तयार करून त्यास सदस्यांची स्वीकृती प्राप्त करून घणे, विविध योजना तयार करणे व त्या मान्य
करून घेणे, करवसुली करणे व त्यावर देखरेख करणे, जिल्हा परिषद, पचायत समिती, शासनाने सोपविलेली कार्ये पार पाडणे, यांसाखी अनेक कामे सरपंचाला करावी लागतात.

* सरपंचाची कामेः-

१) ग्रामपंचायतीच्या सभेचे अध्यक्ष स्थान भूषविणे व सभेचे नियमन करणे.

२) कायद्यातील तरतुदी आणि ग्रामपंचायतीने केलेले ठराव यांची अंमलबजावणी करणे.

३) ग्रामपंचायतीचे अधिकारी व नोरकरवर्ग यांच्यावर नियंत्रण ठेवणे.

४) ग्रामसभेची बैठक बोलाविणे.

* पदावरुन दुर करणे -

कर्तव्ये पार पाडताना केलेली गैरवर्तणूक, असभ्य वर्तन, कर्तव्ये पार पाडताना दाखविलेला निष्काळजीपणा वा असमर्थता इ. कारणांवरून जिल्हा परिषद स्थायी समिती सरपंचाला पदावरून दुर करते.

* सरपंच सलग तीन महिने गैरहजर राहिल्यास त्याची चौकशी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. त्या विरुध्द तीस दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील करावे लागते.

* सरपंचाला मानधन - ग्रामपंचायतीच्या उत्पादनाचे दोन टक्के किंवा सहा हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती.

* हिशोब तपासणी -

१) राज्य शासन पंचायत राज संस्थांचे हिशेब तपासणीसाठी कायद्यानुसार ग्रामपंचायतीचे उत्पन्न ५०००/- रु. पेक्षा कमी असल्यास जिल्हा परिषद हिशोब तपासणी करते. उत्पन्न ५०००/- रु. पेक्षा जास्त असल्यास हिशोब
तपासणी लेखापाल, स्थानिक लेखानिधी करतात.

२) ग्रामपंचायतींची कार्यालयीन तपासणी करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी अधिका-यास व त्यांनी अधिकार प्रदान केल्यास विस्तार अधिकारी ग्रामपंचायतीची कार्यालयीन तपासणी करू शकतो.

* सरपंच समिती -

१) गटातील १५ ग्रामपंचायतीच्या सरपंचांची किंवा १/५ या पैकी जी संख्या जास्त असेल त्यांची मिळून दरवर्षी सरपंच समिती नेमण्यात येते.

२) या समितीचे स्वरुप सल्लागार आहे. या समितीची बैठक दर दोन महिन्याने भरते.

३) पंचायत समितीचे उपसभापती हे सरपंच समितीचे पदसिध्द अध्यक्ष असतात.

४) ग्रामपंचायतीच्या कार्यात सुसूत्रता आणणे हे या समितीचे कार्य होय. सरपंच समितीचे सचिव विस्तार अधिकारी (पंचायत) हे असतात. या समितीची शिफारस बोंगिरवार समितीने केली होती.

दस्त म्हणजे काय रे भाऊ* दस्त व दस्त नोंदणी

*

१. दस्त (Document)/ संलेख (Instrument)

सर्वसाधारण ज्या लेखाद्वारे कोणतेही हक्क (Rights) किंवा दायित्व (Obligations) -

१. निर्माण करण्यात येते.
२. हस्तांतरित करण्यात येते.
३. मर्यादित करण्यात येते.
४. विस्तारित करण्यात येते.
५. नष्ट करण्यात येते.
६. अभिलीखीत करण्यात येते.

अशा लेखास मुद्रांक कायद्यान्वये दस्त/ संलेख असे म्हणतात. बोलीभाषेत त्याला दस्तऐवज असे म्हणतात.

२.दस्त नोंदणी (Document Registration )म्हणजे काय ?

दस्त नोंदणी करण्याचा सर्वसाधारण अर्थ पुढीलप्रमाणे सांगता येईल-

१. पक्षकारांनी त्यांच्या व्यवहाराचा लिखित व सही केलेला दस्त दुय्यम निबंधक यांचेसमोर हजर करणे (Presentation) व

२. सदर दस्तावर सही केली असल्याचे त्यांनी स्वेच्छेने कबूल करणे (Admission) व

३. अशी कबुली देणारी व्यक्ती खरोखरीच तीच आहे व त्याने त्या दस्तावर सही केली आहे, याची दुय्यम निबंधक यांनी खातरजमा करणे Identification)

४. याप्रमाणे पूर्तता झाल्याची नोंद दस्तावर घेवून, दस्त नोंदणी केला असे दुय्यम निबंधक यांनी प्रमाणित करणे (Registration) व

५. याप्रमाणे पूर्तता झालेला दस्त, नोंदणी पुस्तकामध्ये अभिलिखित करणे (Copying) तसेच त्या दस्ताचा गोषवारा नमूद असलेली सूची (Index) तयार करणे.

थोडक्यात, दस्त नोंदणी करणे म्हणजे दस्तावर संबंधितांनी स्वत: जाणीव ठेवून सही केली असल्याची दुय्यम निबंधकानी खात्री करणे व तसे प्रमाणित करुन दस्त शासकीय अभिलेखात समाविष्ट करुन घेणे. तसेच दस्तामध्ये नमूद व्यवहाराची माहिती / नोटीस तमाम जनतेला माहितीसाठी उपलब्ध करुन देणे आणि त्याद्वारे व्यवहार करणा-यांचे हित संर॑क्षित करणे असाही सर्वसाधारण अर्थ सांगता येतो.

दस्त नोंदणीची कार्यवाही नोंदणी अधिनियम, १९०८ या कायदयान्वये केली जाते. या कायदयातील तरतुदींच्या अनुषंगाने दस्त नोंदणीची सविस्तर कार्यपध्दती महाराष्ट्र नोंदणी नियम,१९६१ अन्वये करवून देण्यात आलेली आहे.

अ. इच्छित व्यवहार करण्यापूर्वी नागरिकांनी साधारणपणे कोणत्या गोष्टींची पडताळणी / खातरजमा करणे अपेक्षित आहे ?

संबंधित मिळकतीचे स्थान व प्रकार इत्यादी निकषांवर अवलंबून असते. मात्र दस्त नोंदणीच्या अनुषंगाने विचार करता, साधारणपणे कोणताही व्यवहार करण्यापूर्वी नागरिकांनी किमान पुढील बाबींची खातरजमा करणे अपेक्षित आहे.

१. ज्या मिळकतीचा व्यवहार करावयाचा आहे, त्या मिळकतीच्या मालकी हक्काची (Title) पडताळणी करावी.
२. व्यवहार मूळ मालकाऐवजी त्याच्या मुखत्यारपत्रधारकाबरोबर (Power of Attorney Holder) होत असेल तर, त्याच्याकडील मुखत्यारपत्राची सत्यता/वैधता तपासावी व त्या मुखत्यारपत्रामध्ये संबंधित मिळकतीबाबत व्यवहार करण्याचे स्पष्ट अधिकार संबंधित मुखत्यारपत्रधारकास दिलेले आहेत याची खात्री करावी.
३. नियोजित व्यवहार राज्यामध्ये प्रचलित कोणत्याही कायदयान्वये प्रतिबंधित नाही याची खातरजमा करावी. कारण नियोजित व्यवहार राज्यामध्ये प्रचलित कोणत्याही कायदयान्वये प्रतिबंधित असेल तर, त्या व्यवहारासाठीच्या दस्ताची नोंदणी होणार नाही.

ब. दस्त नोंदणीसाठी पक्षकारांनी कोणती पूर्वतयारी करणे आवश्यक असते ?

दस्त नोंदणीसाठी पक्षकारांनी साधारण खालीलप्रमाणे पूर्वतयारी करणे आवश्यक असते.

१. व्यवहाराच्या अनुषंगाने दस्त तयार करणे. (लिहीणे)
२. दस्त नोंदणीसाठी दस्त प्रकारानुसार आवश्यक असणारी कागदपत्रे, परवानग्या संकलित करणे.
३. जर दस्तऐवजाचे मुद्रांक शुल्क मिळकतीच्या बाजारमूल्यावर अवलंबून असेल (उदा. खरेदीखत) तर त्या मिळकतीचे मूल्यांकन तपासून घेणे.
४. दस्तास मुद्रांक अधिनियमानुसार देय असणारे मुद्रांक शुल्क भरणे.
५. देय नोंदणी फी भरण्याची पूर्वतयारी करणे.
६. दस्तावर साक्षीदारांसमोर सहया/निष्पादन (Execution) करणे.
७. उपरोक्त प्रमाणे पूर्तता केल्यांनतर, दस्त नोंदणीसाठीचा वेळ वाचविण्यासाठी विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या पुढील पर्यायांचा वापर पक्षकार करु शकतात.
अ) दस्त नोंदणीसाठी आवश्यक असणारी दस्ताची माहिती पब्लिक डाटा एंट्रीद्वारे संगणकावर ऑनलाईन भरणे.
ब) ई-स्टेप इन या सुविधेद्वारे दस्त नोंदणीसाठी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ आरक्षित करणे.

८. दस्तावर सही केल्यानंतर तो चार महिन्यांच्या आत दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी सादर करणे आवश्यक आहे.

क. दस्त निष्पादित (Execute) करणे म्हणजे काय ?

दस्ताचे स्वरुप, त्यातील नमूद विषय/मजकूर/तपशील (अटी व शर्ती) पाहून, वाचून व समजावून घेतल्यानंतर त्यावर संबंधित पक्षकाराने दिनांकीत सही करणे, म्हणजे दस्त निष्पादित (Execute) करणे, असा साधारण अर्थ नोंदणी प्रयोजनार्थ सांगता येईल.

ड. दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात कोणकोणती कागदपत्रे सोबत नेणे आवश्यक आहे?

दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जाताना पुढील कागदपत्रे सोबत नेणे आवश्यक असते.

मंगळवार, २८ मार्च, २०१७

Bvg नवा मार्ग नव्या वाटा

सातारच्या "हणमंतराव गायकवाड" या कोट्याधीश व्यावसायिकाची
एक असामान्य यशोगाथा - BVG Group
माझं गाव सातारा जिल्ह्य़ातलं रहिमतपूर
शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद. याच दोन महान व्यक्ती माझ्या प्रमुख प्रेरणास्रोत बनल्या.
----------------------------------------
संसदेच्या हाऊसकीपिंगचं काम मिळालं आणि त्यानंतर ‘बीव्हीजी’चं नाव पसरतच गेलं.
पुढच्याच वर्षी लोकसभा, राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं मिळाली. पुढं पंतप्रधानांचं निवास.
तिथं बागेतला धूळ बसून काळा झालेला रस्ता पहिल्यासारखा स्वच्छ लालभडक केला आणि त्याने किमया केली.
मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय.
आज ‘बीव्हीजी’च्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे ६० हजार.
अगदी तिसरी उत्तीर्णपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत!
विस्तार वेगाने वाढतोय. भारतीय रेल्वे, टाटा समूह, फोक्सवॅगन, हिंदुस्थान लिव्हर,
ओएनजीसी, आयटीसी. कितीतरी. देशभर २० राज्यांमध्ये चारशेपेक्षा जास्त कंपन्या, संस्था आहेत.
कोणतंही मोठं नाव घ्या. आम्ही तिथं आहोतच.’’
“ माझ्या सभोवताली पैशावर
निजलेले उडय़ा मारणारे
गगनचुंबीत राहणारे
कोटय़धीश-अब्जाधीश
मीही माझ्या ध्रुवावर
सर्वापेक्षा उंचावर
जाण्यासाठी तप करणारा
जेथून कोणीच मला
पैशात तोलू शकणार नाही
भले मी निष्कांचन राहीन
पण ध्रुवावर जरूर जाईन !’’
हो. मी ध्रुवावर जायचं पक्कं केलं होतं. कसं? कधी? माहीत नव्हतं. खिशात पैसा नव्हता, मार्गही माहीत नव्हता, पण जायचं होतं, हे निश्चित! त्यावेळची ही माझी कविता.
मी पुण्यात बिबवेवाडीतल्या व्हीआयटी कॉलेजात होतो. इंजिनीअरींगचे शिक्षण घेत होतो. वसतिगृहात राहायचो. त्याआधी फुगेवाडी ते बिबवेवाडी हे रोजचं ४२ किलोमीटरचं अंतर सायकलवरून कापायचो. वेळ खूप जात होता. म्हणून वसतिगृहात राहायचं ठरवलं. पण महिन्याचं ३०० रुपयांचं भाडं देण्याची ऐपत नव्हती. प्राचार्य खाडिलकर सरांना भेटलो. त्यांनी २५ रुपयांमध्ये राहायची परवानगी दिली. माझी इलेक्ट्रिकची शेगडी होती. तिच्यावर भात शिजवायचो. खालून करपायचा, वरून कच्चा. मधला काढून खायचो. इतर पोरं टिंगल करायची. ती कॅन्टीन, स्वीट मार्टमधून खायला आणायची. पाटर्य़ा करायची. मला रोजच्या भाकरीची भ्रांत होती.
दहापैकी दोन पोरं मदत करायची. शनिवार-रविवारी पार्टीला जायची, मग त्यांच्या जागी मला मेसला जेवायची संधी मिळायची. बाकी पोरं मजा पाहायची.. तेव्हा धडा शिकलो- तुमच्याकडं पैसा असेल तर हजारो लोक जवळ येतात, नसेल तर मजा पाहतात. लहानपणी प्रेरणा मिळावं असं वातावरण आजूबाजूला नव्हतं. पण नेहमीच मोठी स्वप्नं पाहायचो. हे कुठून आलं असेल? आता आठवतं, लहानपणी वडील, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्यानं ऐकायला न्यायचे. व्याख्यानांचे विषय असायचे- शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद. याच दोन महान व्यक्ती माझ्या प्रमुख प्रेरणास्रोत बनल्या.
माझं गाव सातारा जिल्ह्य़ातलं रहिमतपूर. वडील सातारच्या न्यायालयात क्लार्क. तोकडा पगार. ते सतत आजारी असायचे. आई-वडील, मी, धाकटा भाऊ भाडय़ाच्या खोलीत राहायचो. घरात लाइट नव्हती. चौथीत स्कॉलरशिप मिळाली. वर्गातल्या हुशार-श्रीमंत मुलांना मिळाली नव्हती, मला मिळाली. आत्मविश्वास वाढला. वडिलांनी शिक्षणासाठी पुण्यात आणलं. मुक्काम पोस्ट- फुगेवाडी. रामचंद्र फुगे चाळ. १० बाय १० ची खोली. वडिलांना जिल्हा परिषदेत नोकरी मिळाली. आजारपण सुरूच होतं. ते आजारी पडले की तीन-चार महिने बरे व्हायचे नाहीत. ससून, रुबी, बुधराणी, केईएम, िपपरीचं चव्हाण रुग्णालय फिरायचो. दरम्यान, आईला शिक्षिकेची नोकरी मिळाली. तरीपण पैशाची चणचण असायचीच. पैशाची गरज पडली की आई कानातला दागिना, मंगळसूत्र सोनाराकडं तारण ठेवून व्याजानं ५००-१००० रुपये घ्यायची.
माझं नूमवि, मॉडर्न हायस्कूलला शिक्षण झालं. मी वर्गात हुशार. गणितात तर पैकीच्या पैकी मार्क पडायचे. मॉडर्नमध्ये गणिताच्या रासकर सरांचा मी आवडता विद्यार्थी. ते कधीच पैकीच्या पैकी मार्क द्यायचे नाहीत, पण माझा एक मार्क कुठं कापायचा, हा त्यांना प्रश्न पडायचा. या गणितानंच मला उभं केलं. कारण आयुष्यात गणितच तुमच्या कामी येतं.
दहावीत चांगले मार्क मिळाले. आईच्या शाळेतील मुख्याध्यापकांन
ी सुचवलं- डिप्लोमाला घाला. मग गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये गेलो. सायकलने जायचो. याच काळात वडील गेले. त्यांचं वय होतं- ४५ वष्रे नि माझं १८.
वडिलांना कपडय़ांची हौस होती. त्यांना थ्री-पीस सूट आवडायचा. त्यांनी जाण्यापूर्वी महिनाभर आधी सूट शिवायला टाकला होता. ते गेल्यावर मी तो घेऊन आलो. त्या प्रसंगानं सांगितलं- ‘माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही.’ काहीशी विरक्ती आली. त्याच वेळी ठरवलं, काहीतरी वेगळं, इतरांसाठी करायचं. ‘भारत विकास प्रतिष्ठान’ (बीव्हीजी) या नावाची संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून दानशूरांकडून देणग्या घेऊन गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणं सुरू केलं. शिक्षण सुरू असतानाच क्लास घेणं, सॉस-जॅमच्या बाटल्या विकणं, घरं रंगवून देणं अशी कामं घेणं सुरू केलं.
इंजिनीअर बनायचं होतं. त्यासाठी औरंगाबादला प्रवेश मिळत होता, पण आईच्या आग्रहाखातर पुण्यातच राहिलो. व्हीआयटीला प्रवेश मिळाला, पण फीसाठी आईने मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँकेतून १५ हजारांचं कर्ज काढलं. माझा रोजचा ४२ किलोमीटरचा सायकल प्रवास सुरू झाला. दरम्यानच्या काळात वडिलांच्या सेवेतील काही रक्कम मिळाली. इतर काही पैसे जुळवून गुरव-िपपळे येथे प्लॉट घेतला. त्यावर घर बांधलं. पैशाची गरज होती. कॉलेजला प्रॅक्टिकलपुरतं जायचो. बाकी कामाच्या मागे लागलो.
तेव्हा बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियमचं काम सुरू होतं. एका एजन्सीकडं सिव्हिलची कामं होती. त्यांच्याकडं गेलो. माझं शिक्षण सुरू होतं इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगचं आणि हे काम होतं सिव्हिलचं- काँक्रीटचा रस्ता करण्याचं. तीन लाख रुपयांचं कंत्राट होतं. मलाही घर बांधण्याचा अनुभव होता. एजन्सीला सांगताना ‘नरोवा-कुंजरोवा’ केलं. ‘डिप्लोमा केलाय, इंजिनीअरींग करतोय’ असं सांगितलं. पण कुठल्या विषयाचा हे बोललोच नाही. काम मिळालं, ते सात दिवसांत पूर्ण करायचं होतं. खर्च जाऊन दीडेक लाख रुपये सुटणार होते. मजुरांची जुळवाजुळव केली. आपल्याला पैसे मिळणार म्हणून मजुरांनाही जास्त मजुरी दिली. महिला-पुरुष अशा एका जोडीला दीडशे रुपये मिळायचे. मी अडीचशे रुपये दिले. शिवाय सकाळी चहा-वडापाव आणि रात्री त्यांना लागणारं त्यांचं आवडतं पेय. मजूर मंडळी खूश होती. शंभर जोडय़ा, पन्नास गाढवं मिळून पाच दिवसांतच काम उरकलं.
त्याचदरम्यान लातूरचा भूकंप झाला, पैसे अडकले. मध्ये पाऊस झाला. त्यात आमचा रस्ता वाहून गेला. चूक समजली. लेव्हल केली नव्हती. डोक्याला हात लावला. रस्ता पुन्हा केल्याशिवाय पैसे मिळणार नव्हते. रस्ता करण्यासाठी हाती पैसे नव्हते. मजुरांना हे समजलं. ते मदतीला धावून आले. त्यांनी पैसे न घेता काम केलं. सिमेंट, वाळूसुद्धा त्यांनीच मिळवली. रस्ता उत्तम झाला. पैसे मिळाले. सर्वाचे पैसे भागवून वर फायदाही झाला. आयुष्यात असे प्रसंग येत गेले, तेव्हा निराश न होता स्वत:च स्वत:ला प्रेरणा देत राहतो. विवेकानंदांचे ते शब्द उपयोगी पडले. आजही पडतात..
‘जेव्हा दशदिशा अंधकाराने भरून गेल्या होत्या,
तेव्हा मी म्हणत होतो- झुंजा, झुंजत पुढे चला..
आज आशेच्या प्रकाशानं दशदिशा किंचित उजळल्या असतील, तरीदेखील तोच मंत्र आहे- झुंजा, झुंजत पुढे चला!’
पुढं इंजिनीअरींगसाठी वसतिगृहात गेलो. एक सत्य समजलं, ‘जग नेहमीच प्रचंड अपमान करतं. ते मनाला लावून घ्यायचं नाही. तुम्ही हिरे असाल, तरी ते तुम्हालाच सिद्ध करावं लागतं..’ १९९४ साली बी.टेक.ची पदवी मिळाली. ‘टेल्को’मध्ये (आताची ‘टाटा मोटर्स’) ट्रेनी म्हणून नोकरी मिळाली. पगार- महिना सात हजार रुपये. टेल्को म्हणजे प्रतिष्ठेची नोकरी. तिथं नोकरी करत असतानाही घरं रंगवून देण्याची वगरे कामं सुरूच होती. कंपनीत भंगारमध्ये तांब्याच्या वापरलेल्या तारा होत्या. त्यांचा कंपनीसाठी उपयोग केला आणि कंपनीचे अडीच कोटी रुपये वाचवले. त्यामुळे माझ्यावरचा विश्वासही वाढला.
दरम्यान, माझ्या गावाकडून कामाच्या आशेनं मुलं माझ्याकडे येत होती. मी कर्मचारी असल्याने कंपनीतल्या कामाची कंत्राटं घेऊ शकत नव्हतो. कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच उपाय सुचवला- एखाद्या संस्थेतर्फे कामं घ्या. मग ‘भारत विकास प्रतिष्ठान’द्वारे हाऊसकिपींगचं काम घेतलं. ही गोष्ट १९९७ मधली. इंडिया गाडीचा प्रकल्प उभा राहत होता. तो स्वच्छ ठेवण्याचं काम घेतलं. आठ लोक होते. त्यानंतर मात्र मागं वळून पाहिलंच नाही. वाट्टेल ते काम द्या, नाही म्हणायचं नाही. हे आमचं तत्त्व. तेच कामी आलं.
गावचा मित्र उमेश माने हा माझ्यावर विश्वास टाकणारा पहिला माणूस. त्यांनी प्रतिष्ठानच्या कामासाठी नोकरी सोडली. कंत्राटं मिळवणं, पैशाची जुळणी करणं हे माझं काम आणि काम करून घेणं ही उमेश माने यांची जबाबदारी. पहिल्या वर्षीची उलाढाल होती आठ लाख रुपये. पुढच्या वर्षी ती झाली ५६ लाख रुपये. गुणवत्ता, प्रामाणिकपणा, विश्वास आणि वेळेच्या आधी पूर्ण होणारं काम यामुळे आम्हाला काम देणारे लोकच आमची प्रसिद्धी करत होते. आपोआप कामं मिळत होती. १९९९ मध्ये लग्न झालं. पत्नी वैशालीने घरची जबाबदारी उचलली. मग नोकरी सोडून हे काम पूर्णवेळ करायला लागलो. पुढे जनरल इलेक्ट्रिकल्सच्या (जीई) प्लँटचं स्वच्छतेचं काम मिळालं. बंगळुरूला जावं लागणार होतं. विलंब न करता मी, उमेश आणि आठ कामगार तिथं धडकलो. आमचे प्रेरणास्रोत शिवाजी महाराज. त्यांनी दक्षिणेवर स्वारी केली होती. आम्हीसुद्धा त्यांच्याच मातीतले ना! कंपनीचं दोन दिवसांनी ओपनिंग होणार होतं. त्याआधी प्लँट चकाचक केला. कामाची गुणवत्ता पाहून लोक समाधानी होते. मग चेन्नई, हैदराबाद अशी इतर शहरांमधली कामं मिळाली. कामाला नाही म्हणत नव्हतोच. रेल्वे स्थानकं, विमानतळ, रुग्णालये यांच्या स्वच्छतेचं काम घेतलं.. विस्तार वाढत असताना कर्मचाऱ्यांबाबत एक सूत्र कायम ठेवलं. कामावर देखरेख करणारा सुपरवायझर गावातला, विश्वासाचा माणूस, ३० टक्के कर्मचारी पुण्याहून-गावाहून पाठवलेले आणि ७० टक्के स्थानिक कर्मचारी. त्यामुळे कुठंही कामात अडथळा आला नाही.. अजून सारं सुरळीत सुरू आहे.
आणि म्हणूनच असेल कदाचित, मी पाहिलेली स्वप्नं पूर्ण झालीच. कधी तीन दिवसांतच, तर कधी १०-१५ वर्षांनी. १९९७ मध्ये पहिलं कंत्राट मिळालं तेव्हाच स्वप्न पाहिलं- आपल्याला संसदेच्या हाऊसकिपींगचं काम मिळालं तर.? तेव्हा माहीतही नव्हतं, तिथं काय पद्धत असते. पण २००३ साली हे स्वप्न पूर्ण झालं. ‘बीव्हीजी’चं नाव वाढत होतं. ते आता दिल्लीपर्यंत पोहोचलं होतं. संसदेच्या ग्रंथालयाचं कंत्राट मिळालं. देखभालीचं काम. तिथं श्रीनिवासन नावाचा शिस्तबद्ध आणि प्रामाणिक मुख्य अभियंता होता. त्याला भेटून विश्वास दिल्यावर काम मिळालं, पण ते सहा महिन्यांपुरतंच. चांगलं केलं तर पुढं सुरू ठेवणार, नाहीतर हाकलून देणार. त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यासाठी ४० लाख रुपयांची दर्जेदार यंत्रणा विकत घ्यायला लागणार होती. काम सुरू राहिलं नाही तर ही यंत्रणा पांढरा हत्ती ठरणार होती. पण स्वत:वर विश्वास होताच. काम सुरू केलं. ते सुरूच राहिलं. श्रीनिवासन खूश झाले. त्यांनी पुढच्याच वर्षी लोकसभा, राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं दिली. पण सुरक्षेच्या कारणास्तव आत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ‘बीव्हीजी’चे कर्मचारी बाहेरचीच स्वच्छता पाहत होते. बाहेरचा परिसर इतका स्वच्छ पाहून खासदारांनीच याबाबत विचारणा केली. मग थेट लोकसभेच्या सभापतींनी परवानगी दिली, तेव्हा ‘बीव्हीजी’चा लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश झाला. पुढं पंतप्रधानांचं निवास. तिथं बागेत चालण्यासाठी लाल दगडांचा मार्ग होता. तो धूळ बसून काळा झाला होता. तो पहिल्यासारखा स्वच्छ लालभडक केला आणि त्याने किमया केल्यासारखं अनेकांचा विश्वास बसत गेला. मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय.. दिल्लीतील प्रत्येक महत्त्वाच्या वास्तूला ‘बीव्हीजी’ची सेवा मिळू लागली. आज एकटय़ा दिल्लीत ‘बीव्हीजी’चे नऊ हजार लोक काम करतात. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे ६० हजार. अगदी तिसरी उत्तीर्णपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत! विस्तार वेगाने वाढतोय. भारतीय रेल्वे, टाटा समूह, फोक्सवॅगन, हिंदुस्थान लिव्हर, ओएनजीसी, आयटीसी.. कितीतरी ग्राहक आहेत. देशभर २० राज्यांमध्ये चारशेपेक्षा जास्त कंपन्या, संस्था, आस्थापना ग्राहक आहेत. कोणतंही मोठं नाव घ्या. आम्ही तिथं आहोतच. आता विविध क्षेत्रांमध्ये उतरलोय.
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस रुग्णवाहिकेचे (डायल १०८) कंत्राट ‘बीव्हीजी’कडं आहे. त्यासाठी सुविधांनी युक्त रुग्णवाहिका राज्यभर धावत आहेत. याशिवाय लँडस्केप-गार्डनिंग, टेक्निकल सर्व्हिसेस, सुरक्षा सेवा, औद्योगिक सेवा, सोलार पार्क, एलईडी लायटिंग, सोलार पंप, प्लास्टिकपासून इंधन, फूड पार्क अशा अनेक क्षेत्रांत जम बसवतो आहे. ‘नॅशनल इन्नोव्हेशन फाउंडेशन’शी भागीदारी केली आहे. त्याद्वारे विविध व्याधींवरील चहा, आरोग्यदायी उत्पादने, शेळीचे दूध, उंटणीचे दूध, जैविक खते, जैविक कीटकनाशके अशा अनेक उत्पादनांमध्ये प्रवेश केला आहे.
मी इतके सारे उद्योग कसे करू शकतो? कारण माझ्या वाटचालीत विविध टप्प्यांवर भेटलेले असंख्य लोक आज माझ्यासोबत ‘बीव्हीजी’मध्ये आहेत. मी कार्यक्षम माणसं शोधतो आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकतो. बस्स.. हा संच वाढतो आहे, उत्तरोत्तर अधिकच वाढत जाईल. ‘बीव्हीजी’चं ब्रीदवाक्यच आहे- ‘ह्य़ुमॅनिटी अहेड!’
२०२० पर्यंतचे उद्दिष्ट आहे दोन लाख कर्मचारी आणि कंपनीची १० हजार कोटींची उलाढाल! हे सर्व करताना माझ्या कर्मचाऱ्यांचा, सामान्य माणसांचा विचार असतो. कर्मचाऱ्याला इतर कंपन्यांपेक्षा दोन पैसे जास्तच मिळतात. त्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून इतर क्षेत्रांत प्रवेश करतोय. शासनाच्या विविध योजनांतून माझ्या ६०० कर्मचाऱ्यांसाठी स्वस्तात घरे देऊ शकलो. जे.आर.डी.टाटा हे उद्योगातील आदर्श आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकलो- सामाजिक बांधीलकी, कामाची पद्धत, एकजीनसीपणा. त्यामुळेच ‘बीव्हीजी’च्या मुख्यालयाला (चिंचवड, पुणे) नाव दिलंय- ‘बीव्हीजी हाऊस’! टाटांच्या ‘बॉम्बे हाऊस’चा हा प्रभाव!
लोकांचा विचार करत गेलो की आपोआप पैसा मिळतो. मी हेच करत आलो. त्यामुळे मीसुद्धा मोठा झालो. कधी गैर काम करत नाही, कोणाचं वाईट चिंतत नाही, कोणाला फॉलो करत नाही, कोणाशी स्पर्धा करत नाही, संधी मिळाली तरी अनैसर्गीक नफ्याच्या मागे लागत नाही. त्यामुळे कधीही डोळे मिटले तरी शांत झोप लागते.
सर्व थरांत लहानमोठय़ा लोकांमध्ये वावरतो. राजकीय व्यक्ती, आध्यात्मिक गुरू, प्रशासकीय अधिकारी सर्वाशी मैत्री आहे. त्यामुळे अनेकांचे गरसमज होतात, पण कोण काय म्हणतं याकडं लक्ष न देता पुढं जात राहतो. त्याच वेळी कामगाराशी खांद्यावर हात टाकून बोलतो. त्यात काही वेगळं- विशेष वाटत नाही. आता इतकी पत कमावली आहे की, शेकडो कोटींचं कर्ज द्यायला बँका तयार आहेत. पण पूर्वी आईसाठी फ्रीज, वाॅशिंग मशीन घ्यायला कोणी कर्ज देत नव्हतं, ही परिस्थितीही विसरलेलो नाही. म्हणून जमिनीवरूनच चालतो.
खरंतर आता थांबलो तरी वैयक्तिक काही बिघडणार नाही. पण लोकांना जोडणं हे माझं व्यसन आहे. शिवाय आजच्या जगातही सरळ मार्गाने मोठं होता येतं, इतरांनाही मोठं करता येतं, हे दाखवून द्यायचंय. त्यासाठी मला कार्यरत राहावंच लागेल. कारण माझा आजही तोच मंत्र आहे- झुंजा, झुंजत पुढे चला !
- हणमंतराव गायकवाड...